Thursday, February 17, 2011

श्रीमद् भगवद्गीता ९

विभुतीयोग


स्रुष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य सांगितल्यावर आणि या स्रुष्टीचा अधिष्ठाता मीच आहे हे सांगितल्यावर भगवंत या पुढे आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करतात.

ते म्हणतात, बुद्धी, ज्ञान, नि:शंकता, सत्य, आनंद तसेच तणाव, जन्म, म्रुत्यू, अंधार, भिती, अहिंसा, दान, कीर्ती - अपकीर्ती, आपत्ती, लय या सगळ्या गोष्टी मीच बनवल्या आहेत. सप्तर्षी, चार मनु, एवढच नाही तर ही सगळी प्रजा हे माझेच अंश आहेत. मी या स्रुष्टीचा जनक आहे अशी माझ्याबद्दल भावना ठेवणारे लोक माझ्याकडे परत येतात.

यावर सामान्य जिज्ञासू सारखाच अर्जुन भगवंताना एक विनंती करतो. तो म्हणतो, "भगवान, आपण परब्रह्म आणि परमधाम आहात असे देवर्षी नारद म्हणतच आले आहेत, आणि आपणही म्हणत आहात, ऋषींच्या आणि तुमच्या सांगण्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. परंतु, आपलं हे दिव्य रूप या स्रुष्टीमध्ये ठायी ठायी सामावलेलं आहे, हे माझ्यासारख्या सामान्याने कसे समजवावे? आपलं रूप या स्रुष्टीमध्ये कुठे ठाकलं आहे याची मला जाणीव करून देण्यासाठी क्रुपया आपण त्याबाबत विवेचन करावं."

भगवंत आपल्या दैवी विभुतींचे कथन करताना म्हणतात, "देवांमधला इंद्र, रुद्रांमधला शंकर, पर्वतांमधला मेरु, घोड्यांमधला उच्चैश्रवार, हत्तींमधला ऐरावत, पशुंमधला सिंह, पक्ष्यांमधला गरूड, शस्त्रांमधलं वज्र, अक्षरांमधला आकार, यादवांमधला क्रुष्ण आणि पांडवांमधला अर्जुनही मीच आहे.
इतकंच नव्हे तर फसवणुकीच्या प्रकारात वापरलं जाणारं प्यादं देखील मीच आहे." या विभुती योगाचा शेवटी ते म्हणतात की, "या अफाट विश्वात माझाच अंश सामावलेला आहे - यापेक्षा जास्त ज्ञान तू संपादन करण्याची काहीच गरज नाहिये."   

No comments:

Post a Comment