Thursday, February 17, 2011

श्रीमद् भगवद्गीता १०

विश्वरूप दर्शन

भगवंतांच्या दिव्यरूपाचे वर्णन ऐकून आनंदित झालेला अर्जुन म्हणतो, "सृष्टीमध्ये असलेल्या आपल्या स्वरूपाबद्दल ऐकून माझे अज्ञान दूर झाले, पण माझ्या मनात एक नवीनच इच्छा निर्माण झाली आहे. ती इच्छा अशी की ते आपले दिव्यरूप मला पहायला मिळावं. ते रूप जर मी पाहण्यास योग्य असेल तर कृपा करून ते मला दाखवावं.

अर्जुनाविषयी असलेल्या प्रेमापोटी भगवंतानी त्याला आपले बहुरंगी, बहुआयामी, बहुकोनी असं दिव्यरूप दाखवण्यासाठी; अर्जुनास त्यासाठी आवश्यक असणारी दिव्यदृष्टी दिली.

हस्तिनापुरातील संजय धृतराष्ट्राला सांगतो, "ती दिव्यदृष्टी मिळताच अर्जुन पाहतच राहिला. काय पाहू आणि कशाचं वर्णन करू असं त्याला होत होतं. आकाशात हजारो सूर्य तळपत असल्यासारख ते विशारूपाच तेज होतं. असंख्य डोळे, स्वर्गीय आभूषणं, असंख्य पवित्र शस्त्रे, स्वर्गीय अश्या सुगंधाचे अत्तर, अमर्यादित असं ते पसरणारे शरीर, शेकडो बाहू, शेकडो मुखं, आणि त्या मुखात अक्राळ विक्राळ दाढा असे अनादीअनंत असं विश्वरूप दिसत होतं. मुखामध्ये सूर, असुर, ऋषीमुनी, यक्ष, किन्नर सगळंच - सगळंच त्याला दिसलं."

भगवंत त्याला म्हणतात, "या सगळ्याचा, उदय आणि अंत कधी होणार हे मी आधीच निश्चित केले आहे. अर्जुना तू तर निमित्त मात्र आहेस."

विश्वरूप दाखवणार्‍या भगवन्तांशी आपण सलगीने वागतो, त्याची चेष्टा करतो, त्याला एकेरी नावानी हाक मारतो हे आठवून अर्जुनाला काहीसा खेद झाला आणि त्याने भगवंतांची क्षमा मागितली आणि त्याना आपले सौम्य रूप पुन्हा प्रकट करण्याची विनंती केली. भगवंतांनी पुन्हा ते सौम्य रूप प्रकट केले.

विश्वरूप दर्शनाच्या शेवटी, आपलं काम निष्कामपणे आणि निरवैर भावनेने करण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला देतात. 
      

No comments:

Post a Comment