Sunday, February 20, 2011

श्रीमद् भगवद्गीता ११

भक्तियोग


भगवंतानी प्रकट केलेल्या विश्वरूपाचे दर्शन घेतल्यावर, अर्जुनाच्या श्रीकृष्णाबद्दलच्या भावनेने त्याचे अंत:करण भरून आलं. तो पुढे विचारतो की, "जे भक्त तुझी कायम उपासना करत असतात त्यामध्ये  श्रेष्ठ भक्त कोण, हे मला सांगावं." त्यावर भगवंत म्हणतात, "जे भक्त मोठ्या श्रद्धेने माझं ध्यान करून माझी उपासना करतात, ते भक्त श्रेष्ठ होय. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवून आपल्या  कृतकर्माचे फळ मला अर्पण करतात अश्या श्रेष्ठ भक्तांचा मी या भवसागरातून उद्धार करतो. त्यामुळे अर्जुना तू जर स्वत:चं मन माझ्यात अर्पण केलंस तर निर्विवादपणे मलाच येऊन मिळशील."  

आपल्या बोलण्याचा ते पुढे विस्तार करतात. "इतर महत्वाचे विषय सोडून माझ्यामध्ये चित्त एकवटणे ही सोपी गोष्ट नव्हे हे सत्य आहे, पण ते कायम करत राहिल्याने शक्य होते. हे शक्य झाले नाही तर तू करशील ते कर्म, माझा प्रतिनिधी या नात्याने करत आहेस अश्या भावनेने कर, हेही शक्य झाले नाही तर, तू फक्त तू तुझे कर्मफळ मला अर्पण केल्यानेही तुला सिद्धी प्राप्त होईल."

भगवंत पुढे सांगतात, "कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान, आणि ध्यानाचा अभ्यास केल्यावर तुला कर्मफलाच त्याग सहजपणे करता येईल. असे केल्यानी तुला शांतीचाही लाभ होईल."

श्रेष्ठ भक्त कोण आहे याचे सविस्तर विवेचन पुढे भगवंत करतात, "जो कोणाचा द्वेष, मत्सर करत नाही, सगळ्यांबरोबर मित्रत्वाचे नाते राखतो, ज्याने आपल्या साधनेचा दृढनिश्चय  केला आहे, आणि ज्याने निश्चयाचे पालन कसोशीने केले आहे आणि याबरोबरच तसे करताना ज्याने स्वत:च्या मनाला गर्वाचा स्पर्शही होऊ दिला नाही तोच सर्वोत्तम भक्त आहे "

"ज्याला लोकव्यवहार आणि तत्सम गोष्टींचा कंटाळा येत नाही, आणि ज्या व्यक्तिंचा इतर लोकांनाही राग येत नाही, एखाद्या वाईट घटनेने जो अति शोकाकूल होत नाही आणि आनंदाप्रसंगी ज्याला हर्षातिरेक होत नाही, तसेच जो आपल्या कर्मफळाचा सहजपणे त्याग करू शकतो आणि निंदा-निंदा-स्तुतीच्या अनावश्यक रहाट्गाडग्यामध्ये जुंपून जात नाही असा तो स्थितप्रज्ञ  भक्तच माझा खरा सर्वोत्तम भक्त आहे आणि असा हाच भक्तियोग आहे."

No comments:

Post a Comment