Thursday, April 7, 2011

श्रीमद् भगवद्गीता १४

पुरुषोत्तम योग

सत्व, रज, तम या सृष्टीला घडवणार्या तीन गुणांचे विवेचन केल्यावर भगवंत अर्जुनाला संसारवृक्षाचे स्वरूप सांगतात. ते म्हणतात, "वरच्या बाजूला मुळं आणि खाली फ़ांद्या असा हा अतिविशाल आणि अजब असा अश्वत्थ- वृक्ष. वर असलेले हे मूळ म्हणजे मी तर खाली पसरलेल्या या अगणीत फ़ांद्या म्हणजे हा संसार."

हा सगळा फ़ांद्यारुपी संसार सातवा, राज आणि तम या गुणांच्या तणावानेच वाढल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांचे अंकुर त्याला फ़ुटले आहेत. वेगवेगळे वेद ही या संसारवृक्षाची पानेच. त्यामुळे जो वेद जाणतो तो वेदमुर्ती.

"अश्या या विशाल अश्वत्थाची, वटवृक्षाची सुरुवात कुठे होते किंवा शेवट कुठे होतो  हे कुणालाच माहित नाही. हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचे आहे. सामान्य माणूस यात गुरफ़टून आणि हरवून जातो. यात गुरफ़टून न जाण्याचा एकच मार्ग - वैराग्य. अश्या या वृक्षास तोडायला वैराग्यरुपी कुर्हाडच   उपयोगी पडते. अश्या शस्त्राच्या सहाय्याने हा प्रचंड संसाराचा वृक्ष तोडून मनुष्याने परमात्मा प्राप्तीची वाट धरायलाच पाहिजे. खोटी प्रतिष्ठा, मान, अपमान, सुख, दु:ख अश्या खूप वाढलेल्या फ़ान्द्यातून मार्ग काढतच मनुष्य पुरुषोत्तम पदाला पोहोचतो.

त्या पदाचे वर्णन भगवान करतात, त्या स्थानी ना सूर्य, ना चंद्र आणि ना अग्नी प्रकाशितो.  शिवाय  तिथे पोहोचलेला कोणीही परत येत नाही.

भगवंत पुढे म्हणतात, "शरीरात वास करणारा आत्मा, हा पाच इंद्रिये आणि मन असे धारण करून राहतो, तो आत्मा माझाच अंश. शरीराला सोडून जाताना अज्ञानी माणसाला तो दिसत नाही, ज्ञानी माणसाला मात्र ते स्पष्ट दिसतं. जसा आत्मा माझा अंश त्याच प्रकारे मी जठराचा अंश धारण  करून खाद्य, पेय, चोष्य आणि निलेष्य अश्या चारही प्रकारच्या अन्नाचे पचन करतो. मीच सगळ्यांच्या ह्रदयात वास करतो. वेदांचा कर्ता मी, वेदांचं ज्ञान मी आणि वेदांचा ज्ञाता ही मीच आहे."

ते पुढे म्हणतात, "माझं हे खरं स्वरूप जो जाणतो, तो माझीच उपासना करत असतो, तो पुरुषोत्तम मीच आणि माझी अशी उपासना करणारा साधक मलाच येवून मिळतो."   

श्रीमद् भगवद्गीता १३

संपूर्ण सृष्टी (क्षेत्र) आणि परमात्मा (क्षेत्रज्ञ) याचे विवेचन केल्यावर, श्रीमान या जगातल्या तीन गुणांचे म्हणजेच सत्व, रज आणि तम यांचे ज्ञान अर्जुनाला देतात.  ते म्हणतात,

"या तीनही गुणांचे ज्ञान ज्यांना प्राप्त झाले ते गुणी ऋषीजन माझ्याकडे आले. अश्या ’ब्रह्मीभूत’ झालेल्या जनांत जन्म, मृत्यू, सुख, दु:ख यापैकी काहीच नाही." भगवान पुढे म्हणतात,

"सत्व हा शुद्धतेचा, शुभ्रतेचा, तसेच प्रकाशाचा गुण. या सृष्टीत जे काही धवल आहे ते सत्वगुणाचेच एक रूप आहे. सत्वगुण धारण करणारा मनुष्य मृत्यू नंतर स्वर्गात जातो."

"रजोगुण हा आसक्तीचा, असमाधानीपणा असलेला गुण आहे. अश्या व्यक्तींची आसक्ती त्याना कधीच स्वस्थ बसून देत नाही. तो काहीनाकाही मिळवण्यासाठी सतत  धडपडत  असतो.  असा  मनुष्य  पृथ्वी तलावर सतत जन्म घेत राहतो, आणि त्यामुळेच मोक्ष प्राप्तीपासून कायम दूर राहतो."

"तिसरा तमोगुण, हा मात्र सत्वगुणाच्या विरुद्ध असा गुण आहे. जिथे जिथे अंधार, अज्ञान आहे, तिथे हा  तमोगुण आहे. शरीराचा आणि मनाचा मंदपणा म्हणजे तमोगुण  असण्याचे संकेत समजावेत. हे लोक कुठल्याही गोष्टिसाठी थोडाफ़ार प्रयत्नही करत नाहीत."

"सत्वगुणी स्वर्गात, रजोगुणी पुन:पुन्हा भूतलावर आणि तमोगुणी सतत अधोगती होउन पाताळात म्हणजेच नरकात जातात. परंतु जो अनन्यभक्तीने माझ्यावर भक्ती करतो, सुख व दु:ख यांचा त्याग करतो, ’सोने रुपे आमुच्या काय कामाचे’ अशी ज्याची वागणूक असेल तो या तीनही गुणांना पार लरून माझ्यामध्ये सामील होतो म्हणजेच त्याला मोक्ष प्राप्ती होते, असं आश्वासन भगवंत पार्थास देतात.            

Wednesday, April 6, 2011

श्रीमद् भगवद्गीता १२

विश्वरुपाचे दर्शन घेतल्यावर अर्जुन असाधारण भावनेने भगवंताना शरण येतो. भगवंत पुन्हा एकदा परतत्वाच्या गुढतेवर उपदेश करू लागतात.

"शरीर म्हणजे अखिल स्रुष्टी असे हे क्षेत्र; आणि या क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा होय."

सगळे गुण व अवगुण हे या क्षेत्राचे असतात ( म्हणजेच वर सांगितल्याप्रमाणे शरीररुपी चराचर सृष्टीचे). त्याचबरोबर ज्या रीतीने भास्कर सगळ्या सृष्टीला उजळून टाकतो, तसच क्षेत्रज्ञ हा या संपूर्ण क्षेत्राला उजळून टाकतो.

परतत्वाचे गूढ असे रहस्य भगवंत पुढे मांडतात.  शुद्ध  ज्ञानाची  उकल  करताना  ते  म्हणतात  "अनासक्तपणे, मनाचा तोल राखून, अनन्य भावनेने केले ही खरी भक्ती होय. तर 'मी' हे ध्येय आहे, हे जाणून घेवून जे ज्ञान मिळते ते शुद्ध ज्ञान होय. असे ज्ञान असणारा, उत्पत्ती, स्थिती, लय, परिस्थिती याना सगुणत्व  प्राप्त करून देवून खरा ज्ञानी होतो."