Thursday, April 7, 2011

श्रीमद् भगवद्गीता १४

पुरुषोत्तम योग

सत्व, रज, तम या सृष्टीला घडवणार्या तीन गुणांचे विवेचन केल्यावर भगवंत अर्जुनाला संसारवृक्षाचे स्वरूप सांगतात. ते म्हणतात, "वरच्या बाजूला मुळं आणि खाली फ़ांद्या असा हा अतिविशाल आणि अजब असा अश्वत्थ- वृक्ष. वर असलेले हे मूळ म्हणजे मी तर खाली पसरलेल्या या अगणीत फ़ांद्या म्हणजे हा संसार."

हा सगळा फ़ांद्यारुपी संसार सातवा, राज आणि तम या गुणांच्या तणावानेच वाढल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांचे अंकुर त्याला फ़ुटले आहेत. वेगवेगळे वेद ही या संसारवृक्षाची पानेच. त्यामुळे जो वेद जाणतो तो वेदमुर्ती.

"अश्या या विशाल अश्वत्थाची, वटवृक्षाची सुरुवात कुठे होते किंवा शेवट कुठे होतो  हे कुणालाच माहित नाही. हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचे आहे. सामान्य माणूस यात गुरफ़टून आणि हरवून जातो. यात गुरफ़टून न जाण्याचा एकच मार्ग - वैराग्य. अश्या या वृक्षास तोडायला वैराग्यरुपी कुर्हाडच   उपयोगी पडते. अश्या शस्त्राच्या सहाय्याने हा प्रचंड संसाराचा वृक्ष तोडून मनुष्याने परमात्मा प्राप्तीची वाट धरायलाच पाहिजे. खोटी प्रतिष्ठा, मान, अपमान, सुख, दु:ख अश्या खूप वाढलेल्या फ़ान्द्यातून मार्ग काढतच मनुष्य पुरुषोत्तम पदाला पोहोचतो.

त्या पदाचे वर्णन भगवान करतात, त्या स्थानी ना सूर्य, ना चंद्र आणि ना अग्नी प्रकाशितो.  शिवाय  तिथे पोहोचलेला कोणीही परत येत नाही.

भगवंत पुढे म्हणतात, "शरीरात वास करणारा आत्मा, हा पाच इंद्रिये आणि मन असे धारण करून राहतो, तो आत्मा माझाच अंश. शरीराला सोडून जाताना अज्ञानी माणसाला तो दिसत नाही, ज्ञानी माणसाला मात्र ते स्पष्ट दिसतं. जसा आत्मा माझा अंश त्याच प्रकारे मी जठराचा अंश धारण  करून खाद्य, पेय, चोष्य आणि निलेष्य अश्या चारही प्रकारच्या अन्नाचे पचन करतो. मीच सगळ्यांच्या ह्रदयात वास करतो. वेदांचा कर्ता मी, वेदांचं ज्ञान मी आणि वेदांचा ज्ञाता ही मीच आहे."

ते पुढे म्हणतात, "माझं हे खरं स्वरूप जो जाणतो, तो माझीच उपासना करत असतो, तो पुरुषोत्तम मीच आणि माझी अशी उपासना करणारा साधक मलाच येवून मिळतो."   

श्रीमद् भगवद्गीता १३

संपूर्ण सृष्टी (क्षेत्र) आणि परमात्मा (क्षेत्रज्ञ) याचे विवेचन केल्यावर, श्रीमान या जगातल्या तीन गुणांचे म्हणजेच सत्व, रज आणि तम यांचे ज्ञान अर्जुनाला देतात.  ते म्हणतात,

"या तीनही गुणांचे ज्ञान ज्यांना प्राप्त झाले ते गुणी ऋषीजन माझ्याकडे आले. अश्या ’ब्रह्मीभूत’ झालेल्या जनांत जन्म, मृत्यू, सुख, दु:ख यापैकी काहीच नाही." भगवान पुढे म्हणतात,

"सत्व हा शुद्धतेचा, शुभ्रतेचा, तसेच प्रकाशाचा गुण. या सृष्टीत जे काही धवल आहे ते सत्वगुणाचेच एक रूप आहे. सत्वगुण धारण करणारा मनुष्य मृत्यू नंतर स्वर्गात जातो."

"रजोगुण हा आसक्तीचा, असमाधानीपणा असलेला गुण आहे. अश्या व्यक्तींची आसक्ती त्याना कधीच स्वस्थ बसून देत नाही. तो काहीनाकाही मिळवण्यासाठी सतत  धडपडत  असतो.  असा  मनुष्य  पृथ्वी तलावर सतत जन्म घेत राहतो, आणि त्यामुळेच मोक्ष प्राप्तीपासून कायम दूर राहतो."

"तिसरा तमोगुण, हा मात्र सत्वगुणाच्या विरुद्ध असा गुण आहे. जिथे जिथे अंधार, अज्ञान आहे, तिथे हा  तमोगुण आहे. शरीराचा आणि मनाचा मंदपणा म्हणजे तमोगुण  असण्याचे संकेत समजावेत. हे लोक कुठल्याही गोष्टिसाठी थोडाफ़ार प्रयत्नही करत नाहीत."

"सत्वगुणी स्वर्गात, रजोगुणी पुन:पुन्हा भूतलावर आणि तमोगुणी सतत अधोगती होउन पाताळात म्हणजेच नरकात जातात. परंतु जो अनन्यभक्तीने माझ्यावर भक्ती करतो, सुख व दु:ख यांचा त्याग करतो, ’सोने रुपे आमुच्या काय कामाचे’ अशी ज्याची वागणूक असेल तो या तीनही गुणांना पार लरून माझ्यामध्ये सामील होतो म्हणजेच त्याला मोक्ष प्राप्ती होते, असं आश्वासन भगवंत पार्थास देतात.            

Wednesday, April 6, 2011

श्रीमद् भगवद्गीता १२

विश्वरुपाचे दर्शन घेतल्यावर अर्जुन असाधारण भावनेने भगवंताना शरण येतो. भगवंत पुन्हा एकदा परतत्वाच्या गुढतेवर उपदेश करू लागतात.

"शरीर म्हणजे अखिल स्रुष्टी असे हे क्षेत्र; आणि या क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा होय."

सगळे गुण व अवगुण हे या क्षेत्राचे असतात ( म्हणजेच वर सांगितल्याप्रमाणे शरीररुपी चराचर सृष्टीचे). त्याचबरोबर ज्या रीतीने भास्कर सगळ्या सृष्टीला उजळून टाकतो, तसच क्षेत्रज्ञ हा या संपूर्ण क्षेत्राला उजळून टाकतो.

परतत्वाचे गूढ असे रहस्य भगवंत पुढे मांडतात.  शुद्ध  ज्ञानाची  उकल  करताना  ते  म्हणतात  "अनासक्तपणे, मनाचा तोल राखून, अनन्य भावनेने केले ही खरी भक्ती होय. तर 'मी' हे ध्येय आहे, हे जाणून घेवून जे ज्ञान मिळते ते शुद्ध ज्ञान होय. असे ज्ञान असणारा, उत्पत्ती, स्थिती, लय, परिस्थिती याना सगुणत्व  प्राप्त करून देवून खरा ज्ञानी होतो."

Sunday, February 20, 2011

श्रीमद् भगवद्गीता ११

भक्तियोग


भगवंतानी प्रकट केलेल्या विश्वरूपाचे दर्शन घेतल्यावर, अर्जुनाच्या श्रीकृष्णाबद्दलच्या भावनेने त्याचे अंत:करण भरून आलं. तो पुढे विचारतो की, "जे भक्त तुझी कायम उपासना करत असतात त्यामध्ये  श्रेष्ठ भक्त कोण, हे मला सांगावं." त्यावर भगवंत म्हणतात, "जे भक्त मोठ्या श्रद्धेने माझं ध्यान करून माझी उपासना करतात, ते भक्त श्रेष्ठ होय. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवून आपल्या  कृतकर्माचे फळ मला अर्पण करतात अश्या श्रेष्ठ भक्तांचा मी या भवसागरातून उद्धार करतो. त्यामुळे अर्जुना तू जर स्वत:चं मन माझ्यात अर्पण केलंस तर निर्विवादपणे मलाच येऊन मिळशील."  

आपल्या बोलण्याचा ते पुढे विस्तार करतात. "इतर महत्वाचे विषय सोडून माझ्यामध्ये चित्त एकवटणे ही सोपी गोष्ट नव्हे हे सत्य आहे, पण ते कायम करत राहिल्याने शक्य होते. हे शक्य झाले नाही तर तू करशील ते कर्म, माझा प्रतिनिधी या नात्याने करत आहेस अश्या भावनेने कर, हेही शक्य झाले नाही तर, तू फक्त तू तुझे कर्मफळ मला अर्पण केल्यानेही तुला सिद्धी प्राप्त होईल."

भगवंत पुढे सांगतात, "कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान, आणि ध्यानाचा अभ्यास केल्यावर तुला कर्मफलाच त्याग सहजपणे करता येईल. असे केल्यानी तुला शांतीचाही लाभ होईल."

श्रेष्ठ भक्त कोण आहे याचे सविस्तर विवेचन पुढे भगवंत करतात, "जो कोणाचा द्वेष, मत्सर करत नाही, सगळ्यांबरोबर मित्रत्वाचे नाते राखतो, ज्याने आपल्या साधनेचा दृढनिश्चय  केला आहे, आणि ज्याने निश्चयाचे पालन कसोशीने केले आहे आणि याबरोबरच तसे करताना ज्याने स्वत:च्या मनाला गर्वाचा स्पर्शही होऊ दिला नाही तोच सर्वोत्तम भक्त आहे "

"ज्याला लोकव्यवहार आणि तत्सम गोष्टींचा कंटाळा येत नाही, आणि ज्या व्यक्तिंचा इतर लोकांनाही राग येत नाही, एखाद्या वाईट घटनेने जो अति शोकाकूल होत नाही आणि आनंदाप्रसंगी ज्याला हर्षातिरेक होत नाही, तसेच जो आपल्या कर्मफळाचा सहजपणे त्याग करू शकतो आणि निंदा-निंदा-स्तुतीच्या अनावश्यक रहाट्गाडग्यामध्ये जुंपून जात नाही असा तो स्थितप्रज्ञ  भक्तच माझा खरा सर्वोत्तम भक्त आहे आणि असा हाच भक्तियोग आहे."

Thursday, February 17, 2011

श्रीमद् भगवद्गीता १०

विश्वरूप दर्शन

भगवंतांच्या दिव्यरूपाचे वर्णन ऐकून आनंदित झालेला अर्जुन म्हणतो, "सृष्टीमध्ये असलेल्या आपल्या स्वरूपाबद्दल ऐकून माझे अज्ञान दूर झाले, पण माझ्या मनात एक नवीनच इच्छा निर्माण झाली आहे. ती इच्छा अशी की ते आपले दिव्यरूप मला पहायला मिळावं. ते रूप जर मी पाहण्यास योग्य असेल तर कृपा करून ते मला दाखवावं.

अर्जुनाविषयी असलेल्या प्रेमापोटी भगवंतानी त्याला आपले बहुरंगी, बहुआयामी, बहुकोनी असं दिव्यरूप दाखवण्यासाठी; अर्जुनास त्यासाठी आवश्यक असणारी दिव्यदृष्टी दिली.

हस्तिनापुरातील संजय धृतराष्ट्राला सांगतो, "ती दिव्यदृष्टी मिळताच अर्जुन पाहतच राहिला. काय पाहू आणि कशाचं वर्णन करू असं त्याला होत होतं. आकाशात हजारो सूर्य तळपत असल्यासारख ते विशारूपाच तेज होतं. असंख्य डोळे, स्वर्गीय आभूषणं, असंख्य पवित्र शस्त्रे, स्वर्गीय अश्या सुगंधाचे अत्तर, अमर्यादित असं ते पसरणारे शरीर, शेकडो बाहू, शेकडो मुखं, आणि त्या मुखात अक्राळ विक्राळ दाढा असे अनादीअनंत असं विश्वरूप दिसत होतं. मुखामध्ये सूर, असुर, ऋषीमुनी, यक्ष, किन्नर सगळंच - सगळंच त्याला दिसलं."

भगवंत त्याला म्हणतात, "या सगळ्याचा, उदय आणि अंत कधी होणार हे मी आधीच निश्चित केले आहे. अर्जुना तू तर निमित्त मात्र आहेस."

विश्वरूप दाखवणार्‍या भगवन्तांशी आपण सलगीने वागतो, त्याची चेष्टा करतो, त्याला एकेरी नावानी हाक मारतो हे आठवून अर्जुनाला काहीसा खेद झाला आणि त्याने भगवंतांची क्षमा मागितली आणि त्याना आपले सौम्य रूप पुन्हा प्रकट करण्याची विनंती केली. भगवंतांनी पुन्हा ते सौम्य रूप प्रकट केले.

विश्वरूप दर्शनाच्या शेवटी, आपलं काम निष्कामपणे आणि निरवैर भावनेने करण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला देतात. 
      

श्रीमद् भगवद्गीता ९

विभुतीयोग


स्रुष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य सांगितल्यावर आणि या स्रुष्टीचा अधिष्ठाता मीच आहे हे सांगितल्यावर भगवंत या पुढे आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करतात.

ते म्हणतात, बुद्धी, ज्ञान, नि:शंकता, सत्य, आनंद तसेच तणाव, जन्म, म्रुत्यू, अंधार, भिती, अहिंसा, दान, कीर्ती - अपकीर्ती, आपत्ती, लय या सगळ्या गोष्टी मीच बनवल्या आहेत. सप्तर्षी, चार मनु, एवढच नाही तर ही सगळी प्रजा हे माझेच अंश आहेत. मी या स्रुष्टीचा जनक आहे अशी माझ्याबद्दल भावना ठेवणारे लोक माझ्याकडे परत येतात.

यावर सामान्य जिज्ञासू सारखाच अर्जुन भगवंताना एक विनंती करतो. तो म्हणतो, "भगवान, आपण परब्रह्म आणि परमधाम आहात असे देवर्षी नारद म्हणतच आले आहेत, आणि आपणही म्हणत आहात, ऋषींच्या आणि तुमच्या सांगण्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. परंतु, आपलं हे दिव्य रूप या स्रुष्टीमध्ये ठायी ठायी सामावलेलं आहे, हे माझ्यासारख्या सामान्याने कसे समजवावे? आपलं रूप या स्रुष्टीमध्ये कुठे ठाकलं आहे याची मला जाणीव करून देण्यासाठी क्रुपया आपण त्याबाबत विवेचन करावं."

भगवंत आपल्या दैवी विभुतींचे कथन करताना म्हणतात, "देवांमधला इंद्र, रुद्रांमधला शंकर, पर्वतांमधला मेरु, घोड्यांमधला उच्चैश्रवार, हत्तींमधला ऐरावत, पशुंमधला सिंह, पक्ष्यांमधला गरूड, शस्त्रांमधलं वज्र, अक्षरांमधला आकार, यादवांमधला क्रुष्ण आणि पांडवांमधला अर्जुनही मीच आहे.
इतकंच नव्हे तर फसवणुकीच्या प्रकारात वापरलं जाणारं प्यादं देखील मीच आहे." या विभुती योगाचा शेवटी ते म्हणतात की, "या अफाट विश्वात माझाच अंश सामावलेला आहे - यापेक्षा जास्त ज्ञान तू संपादन करण्याची काहीच गरज नाहिये."   

Friday, January 28, 2011

श्रीमद् भगवद्गीता ८

अक्षरब्रह्म प्राप्ती चे रहस्य 


परतत्वाबद्दल भगवंतानी सांगितलेल्या उपदेशामुळे अर्जुन रणांगणापासून खूपच लांबवर आला होता. त्याने मुमुक्षित अवस्थेत प्रश्न विचारला, तो म्हणतो, "अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, ब्रह्म, धर्म, कर्म हे पारिभाषिक शब्द तुमच्या तोंडून मी ऐकले, पण त्यांचा नेमका आशय माझ्या ध्यानात येत नाही."
भगवान या संज्ञांचे विवेचन करताना म्हणतात,  "अविनाशी, सर्वव्यापी अशी असलेली स्वतंत्र अशी गोष्ट म्हणजे ब्रह्म, त्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म, किन्कर्तव्यमग्न जगात उपभोगाच्या वस्तूंसाठी केलेली क्रुति म्हणजे कर्म होय. साकार वस्तूचे कायम बदलत असणारे स्वरूप म्हणजे अधिभूत, चन्द्र, सूर्य, अलौकिक गुण असणार्‍या व्यक्ती म्हणजे मंगल गोष्टींचे वैश्वीक रूप म्हणजे अधिदैव आणि त्यागाचा स्वामी म्हणजे अधियज्ञ."

पुढे भगवान असे म्हणतात की, "म्रुत्युसमयी जो माझे स्मरण करेल, तो नि:शंक पणे माझ्या जवळ येइल. अर्थात आयुष्य्भर ईश्वराशी अनुसंधान असल्याशिवाय म्रुत्युसमयी त्यांच्या ओठी हे स्मरण येणे अशक्यच."

एवढे सांगून भगवान श्रीक्रुष्ण युद्धभूमीवर असल्याची पुन्हा जाणीव करून देतात आणि म्हणतात, "तु ही माझे स्मरण कर आणि निष्काम भावनेने युद्ध कर, तु ही शेवटी मलाच येउन मिळशील" यानंतर भगवान दिवस-रात्र, शुक्ल्-क्रुष्ण पक्ष, दक्षिणायन - उत्तरायण यांच अवलोकन करतात. अखेरीस पापपुण्ययुक्त असलेली ही मर्त्य स्रुष्टी आपल्या साधनेने ओलांडून अक्षरब्रह्म पदाला पोहोचण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला करतात.

जे लोक कुठली इच्छा मनात धरून पुण्यकर्म करतात, ते पुण्यकर्माचे फळ संपून गेल्यावर पुन्हा जुने भोग भोगतात, या उलट जे सतत माझे ध्यान करतात, ध्यान करणे जर शक्य नसेल तर फळ, फूल, पान वाहून माझी पूजा अनन्यभावनेने करतात, ते लोक मलाच येवून मिळतात. तेव्हा अर्जुना तु तुझे मन माझ्या ठायी ठेव म्हणजे तू ही मलाच येवून मिळशील असा हा राजविद्या योग आहे.