Friday, January 28, 2011

श्रीमद् भगवद्गीता ८

अक्षरब्रह्म प्राप्ती चे रहस्य 


परतत्वाबद्दल भगवंतानी सांगितलेल्या उपदेशामुळे अर्जुन रणांगणापासून खूपच लांबवर आला होता. त्याने मुमुक्षित अवस्थेत प्रश्न विचारला, तो म्हणतो, "अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, ब्रह्म, धर्म, कर्म हे पारिभाषिक शब्द तुमच्या तोंडून मी ऐकले, पण त्यांचा नेमका आशय माझ्या ध्यानात येत नाही."
भगवान या संज्ञांचे विवेचन करताना म्हणतात,  "अविनाशी, सर्वव्यापी अशी असलेली स्वतंत्र अशी गोष्ट म्हणजे ब्रह्म, त्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म, किन्कर्तव्यमग्न जगात उपभोगाच्या वस्तूंसाठी केलेली क्रुति म्हणजे कर्म होय. साकार वस्तूचे कायम बदलत असणारे स्वरूप म्हणजे अधिभूत, चन्द्र, सूर्य, अलौकिक गुण असणार्‍या व्यक्ती म्हणजे मंगल गोष्टींचे वैश्वीक रूप म्हणजे अधिदैव आणि त्यागाचा स्वामी म्हणजे अधियज्ञ."

पुढे भगवान असे म्हणतात की, "म्रुत्युसमयी जो माझे स्मरण करेल, तो नि:शंक पणे माझ्या जवळ येइल. अर्थात आयुष्य्भर ईश्वराशी अनुसंधान असल्याशिवाय म्रुत्युसमयी त्यांच्या ओठी हे स्मरण येणे अशक्यच."

एवढे सांगून भगवान श्रीक्रुष्ण युद्धभूमीवर असल्याची पुन्हा जाणीव करून देतात आणि म्हणतात, "तु ही माझे स्मरण कर आणि निष्काम भावनेने युद्ध कर, तु ही शेवटी मलाच येउन मिळशील" यानंतर भगवान दिवस-रात्र, शुक्ल्-क्रुष्ण पक्ष, दक्षिणायन - उत्तरायण यांच अवलोकन करतात. अखेरीस पापपुण्ययुक्त असलेली ही मर्त्य स्रुष्टी आपल्या साधनेने ओलांडून अक्षरब्रह्म पदाला पोहोचण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला करतात.

जे लोक कुठली इच्छा मनात धरून पुण्यकर्म करतात, ते पुण्यकर्माचे फळ संपून गेल्यावर पुन्हा जुने भोग भोगतात, या उलट जे सतत माझे ध्यान करतात, ध्यान करणे जर शक्य नसेल तर फळ, फूल, पान वाहून माझी पूजा अनन्यभावनेने करतात, ते लोक मलाच येवून मिळतात. तेव्हा अर्जुना तु तुझे मन माझ्या ठायी ठेव म्हणजे तू ही मलाच येवून मिळशील असा हा राजविद्या योग आहे.

Thursday, January 20, 2011

श्रीमद् भगवद्गीता ७

संपूर्णाचे ज्ञान


विश्वाची उत्पत्ती, रहस्य यांचा उलगडा करण्याची इच्छा बाळगणारे शास्त्र म्हणजे सांख्यशास्त्र. याच्या मुळाशी म्हणजे सांख्यापर्यंत  जाण्याचा मार्ग म्हणजे योग. या योगाचा उपदेश भगवंतानी अर्जुनाला केल्यावर ते पुढे अर्जुनाला सृष्टीचे विज्ञान तसेच परब्रह्माच्या ज्ञानाबद्दल सांगतात.

ते म्हणतात -  "परब्रह्माचे रहस्य जाणून घेण्याकरता - म्हणजेच मला समजण्याकरीता तुला तुझं मन माझ्याकडे एकवटले पाहिजे. आता तुला देत असलेलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूपच कमी लोक प्रयत्न करतात - आणि त्यातूनही एखादाच या ज्ञानापर्यंत पोहोचतो. तुला सांगत असलेले हे ज्ञान प्राप्त केल्यावर तुला अजून प्राप्त करण्यासारखे काहीच उरणार नाही."

भगवान पुढे म्हणतात, "पृथ्वी, अप, तेजो, वायू आणि आकाश हि पाच महाभुतं आहेत. मन, बुद्धी आणि अहंकार ही तीन तत्व अशी माझी जडप्रवृत्ती  आहे,  या सर्व विश्वामध्ये मी आहे - म्हणजेच हे विश्व मी धारण करणे अशी माझी चेतन प्रवृती आहे.  या जगात, जे काही मंगल, पवित्र असं आहे हे माझेच गुण आहेत. भूत, वर्तमान, भविष्य यांचा स्वामी मीच आहे. सत्व, रज, तम हे माझेच गुण आहेत. तुला हे सर्व समजावून घेण्यासाठी मलाच शरण जावे लागेल."


भक्तांचे प्रकार समजावून सांगताना भगवंत म्हणतात, "चार प्रकारचे भक्त माझी उपासना करतात, संकटात सापडलेले ते आर्त, उपभोगाच्या सुखासाठी झटणारे अर्थार्थी, माझा स्वरूप जाणून घ्यायची इच्छा असणारे असे जिज्ञासू आणि माझ्या स्वरूपाचं ज्ञान होवूनही ज्यांचा आनंद लोप पावलेला नाही असे ते ज्ञानी भक्त. अर्थातच या चौघांपैकी ज्ञानी भक्त सर्वात श्रेष्ठ, कारण तो भक्ती साठी भक्ती करत असतो , त्याला त्यातून काहीच मिळणार नसतं. असे हे सर्व सृष्टीचे म्हणजेच परतत्वाचे ज्ञान मी तुला देतो आहे."

     

Monday, January 17, 2011

श्रीमद् भगवद्गीता ६

ध्यानयोग

कर्मयोग आणि सांख्ययोग (सविस्तर माहितीसाठी ही साखळी पहा) यांचे विवेचन केल्यानंतर  श्री भगवंतानी योगाचे विवेचन करायला सुरुवात केली.


ध्यान कसं करावे याचा उपदेश करताना ते म्हणतात, " पवित्र, स्वच्छ अश्या ठिकाणी सुखासना  मध्ये बसावे, आणि नाकाच्या शेंड्याकडे डोळे मिटून पहावे. एकाग्रता पाळून देहाने आणि मनाने ब्रह्मचर्येचे पालन करावे. या स्थिती मध्ये श्वासावर नियंत्रण असणे ही गरजेचे आहे.  भगवंत पुढे असेही म्हणतात कि, "योग्य आहार, योग्य प्रमाणात असलेली विश्रांती, आणि योग्य ती जागरूकता याच्या द्वारे हा योगमार्ग सहज साध्य होतो.  प्रतिदिनी अशी साधना करून त्यात भर घालत राहणे हेच योग मार्गाचे सार आहे."


अश्या साधनेमध्ये रममाण झालेला 'योगी' एखाद्या दीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहत; प्रकाश देत राहतो. त्याला, दगड, माती, सोने चांदी सगळे सारखेच दिसू लागते - सगळे जगच त्याला समान भासू लागते.  त्याला सगळीकडे माझेच रूप दिसते, खरतर ते त्याचे स्वत:चेच रूप असते कारण तो आणि मी वेगळा उरतच नाही.


हे ऐकल्यावर अर्जुनाला प्रश्न पडला कि मन शांत ठेवणे म्हणजे जणू वारा शांत ठेवणे. हे असे महा कठीण काम जमवायचे कसे? त्यावर भगवंत म्हणतात तुला सतत च्या प्रयत्नाने, अभ्यासाने, अनुभवाने आणि त्यामुळे प्राप्त झालेल्या वैराग्याने असे  सगळे करता येईल.


यावर अर्जुन भगवंताना विचारतो - "एखादे वेळेस, एखादा योग मार्गाचा वाटसरू, जेव्हा त्याचा ताबा नं राहिल्याने रस्ता हरवतो, आणि योगसिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच  मरण पावतो त्याचे काय होते? त्याला कुठे जागा मिळते? भगवंत त्यावर असे प्रतिपादन करतात की, "अश्या वेळेस अश्या योग्याला - योगाचे आचरण करण्याची संधी पुन्हा एकदा दिली जाते आणि त्यामुळे योगमार्गाची अर्धवट राहीलेली हि वाट्चाल तो पुन्हा सुरु करतो आणि शेवटी परमपदाला पोहोचतो.


अश्या रितीने कर्मवीर, ज्ञानी, तपस्वी होण्याबरोअबरच भगवंत अर्जुनाला 'योगी' होण्याची आज्ञा या ध्यानयोगामध्ये करतात.       

Wednesday, January 12, 2011

श्रीमद् भगवद्गीता ५

कर्मयोग व कर्मसंन्यास

निष्काम कर्मयोग व ज्ञानयोग यांचा उपदेश ऐकून अर्जुनाने श्रीकृष्णाला शंका विचारली की कर्म आणि ज्ञान यामधील श्रेष्ठ कोण? या दोहोंपैकी कुठला रस्ता श्रेष्ठ? कर्मयोगाचे आचरण केले असता मोक्ष प्राप्त होईल कि कर्मसंन्यासाने मोक्ष साध्य होईल?


भगवान म्हणतात की, "कर्मयोगाची आणि ज्ञानयोगाची तुलना करत असता दोन्ही आचाराने हे परस्परविरुद्ध नाहीत. पण तरीही या मधले श्रेष्ठ हे निष्काम बुद्धीने केलेले कर्म हेच होय. कर्मा पासून संन्यास घेण्यापेक्षा हे कधीही उत्तमच. पूर्णत: कर्मसन्यास घेणे  म्हणजे काहीच कर्म न करणे आणि त्या मार्गे परब्रह्म प्राप्त करणे महाकठीण आहे. पण . .

जो कोणाचा रागराग करत नाही, ज्याला कुठल्या अवाच्यासवा इच्छा धरून ठेवण्याची सवय नसते, तसेच ज्याला कुठल्याही उपभोगाच्या वासनांचा मोह होत नाही त्याला कर्मयोगी मानावा. असा कर्मवीर फार थोड्या वेळातच परमेश्वरास म्हणजे मला शोधतो. आपण जे काम करतो आहे, ती भगवंताची मर्जी आहे, आणि त्या होत असलेल्या कामाचे मिळणारे फळ आपण स्वत:चा अहंकार वगळून, त्याच ईश्वरास अर्पण करत आहोत अश्या मानसिकतेमध्ये केलेले कर्म कायम पुण्यच प्राप्त करून देते. चिखलात राहूनही चिखलाशी अलिप्तपणे राहणाऱ्या कमळासारखा तो मनुष्य पापमुक्त होतो."
थोडक्यात सांगायचे तर 'रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा' हा गीतेतील कर्मयोगाचा मनोभाव आहे.

तात्पर्य असे की दु:ख, सुख किंवा इतर सगळ्या भावना या प्रत्येक कर्माच्या वाट्यात असतातच. पण मिळालेल्या आनंदाचा, दु:खाचा तसेच इतर सगळ्या भावनांचा जो अतिरेक करत नाही आणि भगवंतावर श्रद्धा ठेवून आपलं काम करत असतो तोच मनुष्य या मुक्ततेचा अनुभव घेत असतो.  म्हणजेच सुखाचा बोलबाला न करता आणि शोकाचा कडेलोट न करता भावनांना विवश करून  त्याच्या अज्ञानाचा नाश हळू हळू होत जाते आणि त्याचे अंत:करण सूर्यासारखे तेजस्वी होत जाते.

(क्रमश:)

Monday, January 10, 2011

श्रीमद् भगवद्गीता ४

ज्ञानयोग


भगवंताचे निष्काम कर्मयोगाबद्दल  एवढे सांगून झाल्यावर मुळातच जिज्ञासू असलेल्या अर्जुनाला असा प्रश्न पडला की भगवान श्रीकृष्णाने निष्काम कर्मयोगाचे जे ज्ञान दिले हे ज्ञान अगदी नवीन आहे का? यावर भगवंतानी असे प्रतिपादन केले की हा कर्मयोग त्यांनी फार पूर्वी सूर्याला सांगितला, तदनंतर सूर्याने मनुला सांगितला आणि मनुने  ईक्ष्वाकूला सांगितला होता. हा योग इतका प्राचीन आहे की मधल्या कालावधीमध्ये लुप्त झाला होता. आता पुन्हा योग्य समयी मी तुला सांगत आहे. 
अर्जुनाने गडबडलेल्या विचारात भगवानांना प्रश्न विचारला की सूर्य, मनू, ईक्श्वाकू हे फार प्राचीन काळी होऊन गेले आहेत, पण तुम्ही मला आता सांगितलेला कर्मयोग तोच आहे हे मी कसे समजणार?

अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवान मिश्कीलपणे हसतात आणि अर्जुनाला म्हणतात, "अर्जुना, माझे अनेक जन्म झाले आहेत तसेच तू ही अनेक वेळा जन्म घेतला आहेस, आपल्या दोघांमध्ये फरक एवढाच की तुझे जन्म तुला लक्षात राहिले नाहीत तर माझे मला लक्षात आहेत." याचवेळेस,

यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारता, अभ्युत्थां अधर्मस्य तदान्मानम् स्रुजाम्यहम्
परित्राणाय साधूनां, विनाशायंच दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे

हे तेज:पुन्ज श्लोक भगवंताच्या मुखातून बाहेर पडले होते. या श्लोकाद्वारे ते अर्जुनाला एवढेच सांगतात की, ज्या वेळेस धर्माचा विनाश आणि अधर्माचा प्रभाव वाढतो त्या वेळेस धर्मस्थापनेसाठी म्हणजेच सज्जनाच्या रक्षणासाठी आणि अपप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेईन.

चवथ्या अध्यायात भगवंत अर्जुनाला ज्ञानाची महती सांगतात. निष्काम कर्माच्या उपदेशाबरोबरच ज्ञानाचा योग समजावून सांगतात. "परिपूर्ण ज्ञानाचा अग्नी सर्व कर्मांना जाळून टाकतो. विपुल प्रमाणात ज्ञान असेल तर शंकाकुशंकेचे जाळे त्या दिव्य ज्ञानापुढे निरुपयोगी ठरते. भरपूर ज्ञान असलेला तू अश्या ज्ञानशास्त्राचा विचार तुझ्या मनातील संशय आणि दु:ख दूर करण्यासाठी वापर आणि तुझे कर्तव्य करायला तयार हो " असा ज्ञानयोग, भगवान श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगतात.      

Sunday, January 9, 2011

श्रीमद् भगवद्गीता ३

निष्काम कर्मयोग


स्थितप्रज्ञ मनुष्याचे लक्षण भगवंतानी अर्जुनाला सांगितल्यावर अर्जुनाला अजून एक प्रश्न पडला कि, 'भगवंतानी माझ्या सहचरांशी लढाई करण्याचे दुष्कृत्य करण्यासाठी मलाच का निवडले आहे?' मीच का? आपल्या मनातील ही शंका अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारली तेव्हा भगवंत म्हणाले कि, "काम अजिबात न केल्याने माणूस कर्महीन होतो असं नाही. हे जग चालतं ते प्रत्येक जण आपआपले कर्म करतो त्यामुळेच."

त्या नंतर स्वत:चे उदाहरण देताना भगवंत म्हणतात, "विश्वनियंता असलेला मी उद्या ठरवलं, कि मी काम करणार नाही, तर जगाचा काय विनाश होईल! मला या जगामध्ये मिळवण्यासारखे काहीच नाही तरीही साक्षात मी देखील कर्म करण्यावाचून कधी ढळत नाही."

भगवान पुढे म्हणतात की "श्रेष्ठ मनुष्याचे अनुकरण समाज करतो त्यामुळे स्वत: काही न करता लोकांना उपदेश करून त्याना फैलावर घेणे ही अयोग्यच आहे. गीतेमधला कर्मयोग म्हणजे तुम्ही स्वत: जे कार्य करत आहात ते तुमच्यासाठी त्या घडीला श्रेष्ट आहे या भावनेने आणि फलाची अपेक्षा न धरता करणे. भगवंत अर्जुनाला संबोधून म्हणतात की 'सत्याच्या रक्षणासाठी तसेच भल्यासाठी या रणांगणावर तू इथे दाखल झाला आहेस त्यामुळे युद्धाचे हे कर्म करण्यास तयार हो.' 
                                                                                                                                           (क्रमश:)

Friday, January 7, 2011

श्रीमद् भगवद्गीता २

युद्धभूमीवर सैन्य जमू लागले. शंख नाद होऊ लागला. कौरव आणि पांडव समोरासमोर जमा झाले, आणि युद्धाला सज्ज झाले. कौरवांचा नेता दुर्योधन याने युद्धनीती प्रमाणे आपल्या सैन्याची ओळख पीतामह भीष्म यांना करून दिला. अर्जुनानेही विरोधी सैन्याची पाहणी करण्याची विनंती केली. भगवान श्रीकृष्णानी रथ कौरवसेनेशी नेल्यावर ते सैन्य बघता बघता अर्जुनाच्या मनात विचारांचे वादळ दाटले. तिथे अर्जुनाला गुरु द्रोण दिसले, त्यांचे कुलगुरू कृप दिसले शिवाय सगळे योद्धे हे त्याचे बंधूच होते. सगळे ओळखीचेच लोक! या सगळ्यांशी युद्ध करायचे आणि त्यांना मारायचे, टाळता येण्यासारखा विनाश करायचा, आणि युद्धात जरी विजय झाला तरी तो निन्दनीय आणि बिनकामाचा विजय ठरणार, अश्या विचारांनी अर्जुनाने आपल्या हातातील शस्त्र खाली ठेवले आणि मी लढणार नाही असे सांगितले.

आपला रथसारथी श्रीकृष्णाच्याकडे त्याने त्याची सद्गदित झालेली मानसिक स्थिती मांडली. यावर, श्रीकृष्णाने अर्जुनाची समजूत काढायला सुरुवात केली. भगवान म्हणाले - "अर्जुना, ही युद्धभूमी आहे, आणि इथून तू मागे फिरलास तर लोक तुला हसतील, तुझ्या शौर्याला काही किंमत राहणार नाही, हसं होईल तुझं." भगवंतानी दाखवलेल्या या अश्या लोकनिंदेच्या भीतीमुळे अर्जुन अजूनच गडबडला. पण युद्ध लढायला उठला नाही. तेव्हा भगवंतानी अर्जुनाला 'देह' आणि आत्मा" या मधला फरक सांगितला.

भगवंतानी अर्जुनाला आत्म्याचे गूढ ज्ञान सांगितले. ज्या प्रमाणे आपण कपडे बदलतो, त्या प्रमाणे आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. द्वेष, सुख, तमा, अनुराग, दुख या सगळ्यापलीकडे हा आत्मा असल्या कारणामुळे याच्याबद्दल वाईट वाटून घेणे  यामध्ये काहीच उपयोग नाही. भगवान पुढे म्हणाले - सर्वानी आपआपले कर्तव्य, चांगल्या अथवा वाईट फळाची अपेक्षा न करता म्हणजेच काम, क्रोध,  हर्ष,  शोक  आणि अश्या भावनांवर विजय मिळवून आचरणात आणले पाहिजे. अर्जुनाने यावर प्रश्न विचारला की असे आचरण  जो  करू  शकतो  त्याची लक्षणे  मला  सांगा. श्रीकृष्णाने यावर त्यांना 'स्थितप्रज्ञाची' लक्षणे  सांगितली. कर्म कर, मोह सोडून  दे, चिंता न करता आणि अवघड वळणांवर गोंधळून  न जाता  निष्काम  भावनेने केलेली  सारी  कर्मे  ईश्वरास  समर्पित  कर  असे हे महातत्व  सांगितले.  

( क्रमश: )
        

Wednesday, January 5, 2011

श्रीमद् भगवद्गीता १

प्रस्तावना 

तुम्हाला सांगतो सध्याचे आयुष्य एवढं स्पर्धात्मक, ताणतणावाचे  आणि वैफल्याचे झाले  आहे कि  विचारू नका. मला त्यामुळे वाटले कि महाराष्ट्राची जी थोर संत परंपरा आपल्या सर्वाना लाभली आणि ज्यांनी त्यांचे अमूल्य असे अनुभव कथन लिहिले, आणि त्याद्वारे आयुष्याचे तात्पर्य उलगडले, ते तात्पर्य आणि साधे सुधे विचार हे, वाढते वैफल्य कमी करण्यास पसरवू का नये?

साहजिकच याच कारणामुळे अथवा विश्वासामुळे हिंदू धर्माला अनुसरून पण सर्व जगतात उपयोगास येईल असा भारतीय तत्वज्ञानाचा सर्वोच्च मानबिंदू म्हणजे भगवद्गीता जशी मला समजली तशी उदधृत करावी अशी इच्छा दृढ झाली. 'जशी मला समजली' असे म्हणण्याचे  कारण म्हणजे इतक्या तत्ववेत्याना जसे आद्य शंकराचार्य, क्रांतिकारक - पुढारी लोकमान्य टिळक, ज्ञानेश्वर  माउली यांपासून आत्तापर्यंतच्या हजारो ऋषितुल्य व्यक्तीना या ग्रंथाने भुरळ घातली आणि खरतर प्रत्येकाने या ग्रंथातून त्याना जसे मिळाले तसे घेतले, हेच होय. भगवद्गीतेवर टीका किंवा त्याचे विश्लेषण वगैरे करावे असा माझा हेतू नाही किंबहुना तेवढी माझी बुद्धीही नाही, पण जे मला उमगले, जेवढे मला मिळाले तेवढे तुम्हा पर्यंत कधी एकदा सोप्या शब्दात आणि फार पाल्हाळ न लावता,  थर्ड पर्सन च्या भूमिकेतून आणि प्रभावी भाषेमध्ये पोहोचवतो असे झाले आहे.

उद्यापासूनच प्रकाशनमालेला  सुरुवात करतोय. चुकूनही चूक भूल होणार नाही याची दक्षता मी घेत आहेच, पण अशी चूक आढळल्यास कृपया याची जाणीव अर्जुन.देशपांडे@जीमेल.कॉम या इ-पत्त्यावर करून द्यावी हि नम्र विनंती. 

देहाचा मान

नरदेह हा स्वाधेन| सहसा नव्हे पराधेन|
परंतु हा परोपकारी झीजउन| कीर्तिरूपे उरवावा| 
                                                                                  दासबोध १ - १०
 

जन्माचे कल्याण करण्यासाठी, देह खूप मोठी भूमिका बजावतो. शास्त्राभ्यास, भक्ती, सिद्धीप्राप्ती वगैरे देहामार्फतच होतात. असा हा नरदेह तो परोपकारी झिजवून आठवणरुपी उरवावा आणि असा या देहाचा उपयोग करावा.