Monday, January 10, 2011

श्रीमद् भगवद्गीता ४

ज्ञानयोग


भगवंताचे निष्काम कर्मयोगाबद्दल  एवढे सांगून झाल्यावर मुळातच जिज्ञासू असलेल्या अर्जुनाला असा प्रश्न पडला की भगवान श्रीकृष्णाने निष्काम कर्मयोगाचे जे ज्ञान दिले हे ज्ञान अगदी नवीन आहे का? यावर भगवंतानी असे प्रतिपादन केले की हा कर्मयोग त्यांनी फार पूर्वी सूर्याला सांगितला, तदनंतर सूर्याने मनुला सांगितला आणि मनुने  ईक्ष्वाकूला सांगितला होता. हा योग इतका प्राचीन आहे की मधल्या कालावधीमध्ये लुप्त झाला होता. आता पुन्हा योग्य समयी मी तुला सांगत आहे. 
अर्जुनाने गडबडलेल्या विचारात भगवानांना प्रश्न विचारला की सूर्य, मनू, ईक्श्वाकू हे फार प्राचीन काळी होऊन गेले आहेत, पण तुम्ही मला आता सांगितलेला कर्मयोग तोच आहे हे मी कसे समजणार?

अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवान मिश्कीलपणे हसतात आणि अर्जुनाला म्हणतात, "अर्जुना, माझे अनेक जन्म झाले आहेत तसेच तू ही अनेक वेळा जन्म घेतला आहेस, आपल्या दोघांमध्ये फरक एवढाच की तुझे जन्म तुला लक्षात राहिले नाहीत तर माझे मला लक्षात आहेत." याचवेळेस,

यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारता, अभ्युत्थां अधर्मस्य तदान्मानम् स्रुजाम्यहम्
परित्राणाय साधूनां, विनाशायंच दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे

हे तेज:पुन्ज श्लोक भगवंताच्या मुखातून बाहेर पडले होते. या श्लोकाद्वारे ते अर्जुनाला एवढेच सांगतात की, ज्या वेळेस धर्माचा विनाश आणि अधर्माचा प्रभाव वाढतो त्या वेळेस धर्मस्थापनेसाठी म्हणजेच सज्जनाच्या रक्षणासाठी आणि अपप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेईन.

चवथ्या अध्यायात भगवंत अर्जुनाला ज्ञानाची महती सांगतात. निष्काम कर्माच्या उपदेशाबरोबरच ज्ञानाचा योग समजावून सांगतात. "परिपूर्ण ज्ञानाचा अग्नी सर्व कर्मांना जाळून टाकतो. विपुल प्रमाणात ज्ञान असेल तर शंकाकुशंकेचे जाळे त्या दिव्य ज्ञानापुढे निरुपयोगी ठरते. भरपूर ज्ञान असलेला तू अश्या ज्ञानशास्त्राचा विचार तुझ्या मनातील संशय आणि दु:ख दूर करण्यासाठी वापर आणि तुझे कर्तव्य करायला तयार हो " असा ज्ञानयोग, भगवान श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगतात.      

1 comment: