Friday, January 7, 2011

श्रीमद् भगवद्गीता २

युद्धभूमीवर सैन्य जमू लागले. शंख नाद होऊ लागला. कौरव आणि पांडव समोरासमोर जमा झाले, आणि युद्धाला सज्ज झाले. कौरवांचा नेता दुर्योधन याने युद्धनीती प्रमाणे आपल्या सैन्याची ओळख पीतामह भीष्म यांना करून दिला. अर्जुनानेही विरोधी सैन्याची पाहणी करण्याची विनंती केली. भगवान श्रीकृष्णानी रथ कौरवसेनेशी नेल्यावर ते सैन्य बघता बघता अर्जुनाच्या मनात विचारांचे वादळ दाटले. तिथे अर्जुनाला गुरु द्रोण दिसले, त्यांचे कुलगुरू कृप दिसले शिवाय सगळे योद्धे हे त्याचे बंधूच होते. सगळे ओळखीचेच लोक! या सगळ्यांशी युद्ध करायचे आणि त्यांना मारायचे, टाळता येण्यासारखा विनाश करायचा, आणि युद्धात जरी विजय झाला तरी तो निन्दनीय आणि बिनकामाचा विजय ठरणार, अश्या विचारांनी अर्जुनाने आपल्या हातातील शस्त्र खाली ठेवले आणि मी लढणार नाही असे सांगितले.

आपला रथसारथी श्रीकृष्णाच्याकडे त्याने त्याची सद्गदित झालेली मानसिक स्थिती मांडली. यावर, श्रीकृष्णाने अर्जुनाची समजूत काढायला सुरुवात केली. भगवान म्हणाले - "अर्जुना, ही युद्धभूमी आहे, आणि इथून तू मागे फिरलास तर लोक तुला हसतील, तुझ्या शौर्याला काही किंमत राहणार नाही, हसं होईल तुझं." भगवंतानी दाखवलेल्या या अश्या लोकनिंदेच्या भीतीमुळे अर्जुन अजूनच गडबडला. पण युद्ध लढायला उठला नाही. तेव्हा भगवंतानी अर्जुनाला 'देह' आणि आत्मा" या मधला फरक सांगितला.

भगवंतानी अर्जुनाला आत्म्याचे गूढ ज्ञान सांगितले. ज्या प्रमाणे आपण कपडे बदलतो, त्या प्रमाणे आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. द्वेष, सुख, तमा, अनुराग, दुख या सगळ्यापलीकडे हा आत्मा असल्या कारणामुळे याच्याबद्दल वाईट वाटून घेणे  यामध्ये काहीच उपयोग नाही. भगवान पुढे म्हणाले - सर्वानी आपआपले कर्तव्य, चांगल्या अथवा वाईट फळाची अपेक्षा न करता म्हणजेच काम, क्रोध,  हर्ष,  शोक  आणि अश्या भावनांवर विजय मिळवून आचरणात आणले पाहिजे. अर्जुनाने यावर प्रश्न विचारला की असे आचरण  जो  करू  शकतो  त्याची लक्षणे  मला  सांगा. श्रीकृष्णाने यावर त्यांना 'स्थितप्रज्ञाची' लक्षणे  सांगितली. कर्म कर, मोह सोडून  दे, चिंता न करता आणि अवघड वळणांवर गोंधळून  न जाता  निष्काम  भावनेने केलेली  सारी  कर्मे  ईश्वरास  समर्पित  कर  असे हे महातत्व  सांगितले.  

( क्रमश: )
        

1 comment:

  1. अतिशय सुंदर उपक्रम...खूप खूप शुभेच्छा ...

    ReplyDelete