Sunday, February 20, 2011

श्रीमद् भगवद्गीता ११

भक्तियोग


भगवंतानी प्रकट केलेल्या विश्वरूपाचे दर्शन घेतल्यावर, अर्जुनाच्या श्रीकृष्णाबद्दलच्या भावनेने त्याचे अंत:करण भरून आलं. तो पुढे विचारतो की, "जे भक्त तुझी कायम उपासना करत असतात त्यामध्ये  श्रेष्ठ भक्त कोण, हे मला सांगावं." त्यावर भगवंत म्हणतात, "जे भक्त मोठ्या श्रद्धेने माझं ध्यान करून माझी उपासना करतात, ते भक्त श्रेष्ठ होय. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवून आपल्या  कृतकर्माचे फळ मला अर्पण करतात अश्या श्रेष्ठ भक्तांचा मी या भवसागरातून उद्धार करतो. त्यामुळे अर्जुना तू जर स्वत:चं मन माझ्यात अर्पण केलंस तर निर्विवादपणे मलाच येऊन मिळशील."  

आपल्या बोलण्याचा ते पुढे विस्तार करतात. "इतर महत्वाचे विषय सोडून माझ्यामध्ये चित्त एकवटणे ही सोपी गोष्ट नव्हे हे सत्य आहे, पण ते कायम करत राहिल्याने शक्य होते. हे शक्य झाले नाही तर तू करशील ते कर्म, माझा प्रतिनिधी या नात्याने करत आहेस अश्या भावनेने कर, हेही शक्य झाले नाही तर, तू फक्त तू तुझे कर्मफळ मला अर्पण केल्यानेही तुला सिद्धी प्राप्त होईल."

भगवंत पुढे सांगतात, "कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान, आणि ध्यानाचा अभ्यास केल्यावर तुला कर्मफलाच त्याग सहजपणे करता येईल. असे केल्यानी तुला शांतीचाही लाभ होईल."

श्रेष्ठ भक्त कोण आहे याचे सविस्तर विवेचन पुढे भगवंत करतात, "जो कोणाचा द्वेष, मत्सर करत नाही, सगळ्यांबरोबर मित्रत्वाचे नाते राखतो, ज्याने आपल्या साधनेचा दृढनिश्चय  केला आहे, आणि ज्याने निश्चयाचे पालन कसोशीने केले आहे आणि याबरोबरच तसे करताना ज्याने स्वत:च्या मनाला गर्वाचा स्पर्शही होऊ दिला नाही तोच सर्वोत्तम भक्त आहे "

"ज्याला लोकव्यवहार आणि तत्सम गोष्टींचा कंटाळा येत नाही, आणि ज्या व्यक्तिंचा इतर लोकांनाही राग येत नाही, एखाद्या वाईट घटनेने जो अति शोकाकूल होत नाही आणि आनंदाप्रसंगी ज्याला हर्षातिरेक होत नाही, तसेच जो आपल्या कर्मफळाचा सहजपणे त्याग करू शकतो आणि निंदा-निंदा-स्तुतीच्या अनावश्यक रहाट्गाडग्यामध्ये जुंपून जात नाही असा तो स्थितप्रज्ञ  भक्तच माझा खरा सर्वोत्तम भक्त आहे आणि असा हाच भक्तियोग आहे."

Thursday, February 17, 2011

श्रीमद् भगवद्गीता १०

विश्वरूप दर्शन

भगवंतांच्या दिव्यरूपाचे वर्णन ऐकून आनंदित झालेला अर्जुन म्हणतो, "सृष्टीमध्ये असलेल्या आपल्या स्वरूपाबद्दल ऐकून माझे अज्ञान दूर झाले, पण माझ्या मनात एक नवीनच इच्छा निर्माण झाली आहे. ती इच्छा अशी की ते आपले दिव्यरूप मला पहायला मिळावं. ते रूप जर मी पाहण्यास योग्य असेल तर कृपा करून ते मला दाखवावं.

अर्जुनाविषयी असलेल्या प्रेमापोटी भगवंतानी त्याला आपले बहुरंगी, बहुआयामी, बहुकोनी असं दिव्यरूप दाखवण्यासाठी; अर्जुनास त्यासाठी आवश्यक असणारी दिव्यदृष्टी दिली.

हस्तिनापुरातील संजय धृतराष्ट्राला सांगतो, "ती दिव्यदृष्टी मिळताच अर्जुन पाहतच राहिला. काय पाहू आणि कशाचं वर्णन करू असं त्याला होत होतं. आकाशात हजारो सूर्य तळपत असल्यासारख ते विशारूपाच तेज होतं. असंख्य डोळे, स्वर्गीय आभूषणं, असंख्य पवित्र शस्त्रे, स्वर्गीय अश्या सुगंधाचे अत्तर, अमर्यादित असं ते पसरणारे शरीर, शेकडो बाहू, शेकडो मुखं, आणि त्या मुखात अक्राळ विक्राळ दाढा असे अनादीअनंत असं विश्वरूप दिसत होतं. मुखामध्ये सूर, असुर, ऋषीमुनी, यक्ष, किन्नर सगळंच - सगळंच त्याला दिसलं."

भगवंत त्याला म्हणतात, "या सगळ्याचा, उदय आणि अंत कधी होणार हे मी आधीच निश्चित केले आहे. अर्जुना तू तर निमित्त मात्र आहेस."

विश्वरूप दाखवणार्‍या भगवन्तांशी आपण सलगीने वागतो, त्याची चेष्टा करतो, त्याला एकेरी नावानी हाक मारतो हे आठवून अर्जुनाला काहीसा खेद झाला आणि त्याने भगवंतांची क्षमा मागितली आणि त्याना आपले सौम्य रूप पुन्हा प्रकट करण्याची विनंती केली. भगवंतांनी पुन्हा ते सौम्य रूप प्रकट केले.

विश्वरूप दर्शनाच्या शेवटी, आपलं काम निष्कामपणे आणि निरवैर भावनेने करण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला देतात. 
      

श्रीमद् भगवद्गीता ९

विभुतीयोग


स्रुष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य सांगितल्यावर आणि या स्रुष्टीचा अधिष्ठाता मीच आहे हे सांगितल्यावर भगवंत या पुढे आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करतात.

ते म्हणतात, बुद्धी, ज्ञान, नि:शंकता, सत्य, आनंद तसेच तणाव, जन्म, म्रुत्यू, अंधार, भिती, अहिंसा, दान, कीर्ती - अपकीर्ती, आपत्ती, लय या सगळ्या गोष्टी मीच बनवल्या आहेत. सप्तर्षी, चार मनु, एवढच नाही तर ही सगळी प्रजा हे माझेच अंश आहेत. मी या स्रुष्टीचा जनक आहे अशी माझ्याबद्दल भावना ठेवणारे लोक माझ्याकडे परत येतात.

यावर सामान्य जिज्ञासू सारखाच अर्जुन भगवंताना एक विनंती करतो. तो म्हणतो, "भगवान, आपण परब्रह्म आणि परमधाम आहात असे देवर्षी नारद म्हणतच आले आहेत, आणि आपणही म्हणत आहात, ऋषींच्या आणि तुमच्या सांगण्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. परंतु, आपलं हे दिव्य रूप या स्रुष्टीमध्ये ठायी ठायी सामावलेलं आहे, हे माझ्यासारख्या सामान्याने कसे समजवावे? आपलं रूप या स्रुष्टीमध्ये कुठे ठाकलं आहे याची मला जाणीव करून देण्यासाठी क्रुपया आपण त्याबाबत विवेचन करावं."

भगवंत आपल्या दैवी विभुतींचे कथन करताना म्हणतात, "देवांमधला इंद्र, रुद्रांमधला शंकर, पर्वतांमधला मेरु, घोड्यांमधला उच्चैश्रवार, हत्तींमधला ऐरावत, पशुंमधला सिंह, पक्ष्यांमधला गरूड, शस्त्रांमधलं वज्र, अक्षरांमधला आकार, यादवांमधला क्रुष्ण आणि पांडवांमधला अर्जुनही मीच आहे.
इतकंच नव्हे तर फसवणुकीच्या प्रकारात वापरलं जाणारं प्यादं देखील मीच आहे." या विभुती योगाचा शेवटी ते म्हणतात की, "या अफाट विश्वात माझाच अंश सामावलेला आहे - यापेक्षा जास्त ज्ञान तू संपादन करण्याची काहीच गरज नाहिये."   

Friday, January 28, 2011

श्रीमद् भगवद्गीता ८

अक्षरब्रह्म प्राप्ती चे रहस्य 


परतत्वाबद्दल भगवंतानी सांगितलेल्या उपदेशामुळे अर्जुन रणांगणापासून खूपच लांबवर आला होता. त्याने मुमुक्षित अवस्थेत प्रश्न विचारला, तो म्हणतो, "अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, ब्रह्म, धर्म, कर्म हे पारिभाषिक शब्द तुमच्या तोंडून मी ऐकले, पण त्यांचा नेमका आशय माझ्या ध्यानात येत नाही."
भगवान या संज्ञांचे विवेचन करताना म्हणतात,  "अविनाशी, सर्वव्यापी अशी असलेली स्वतंत्र अशी गोष्ट म्हणजे ब्रह्म, त्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म, किन्कर्तव्यमग्न जगात उपभोगाच्या वस्तूंसाठी केलेली क्रुति म्हणजे कर्म होय. साकार वस्तूचे कायम बदलत असणारे स्वरूप म्हणजे अधिभूत, चन्द्र, सूर्य, अलौकिक गुण असणार्‍या व्यक्ती म्हणजे मंगल गोष्टींचे वैश्वीक रूप म्हणजे अधिदैव आणि त्यागाचा स्वामी म्हणजे अधियज्ञ."

पुढे भगवान असे म्हणतात की, "म्रुत्युसमयी जो माझे स्मरण करेल, तो नि:शंक पणे माझ्या जवळ येइल. अर्थात आयुष्य्भर ईश्वराशी अनुसंधान असल्याशिवाय म्रुत्युसमयी त्यांच्या ओठी हे स्मरण येणे अशक्यच."

एवढे सांगून भगवान श्रीक्रुष्ण युद्धभूमीवर असल्याची पुन्हा जाणीव करून देतात आणि म्हणतात, "तु ही माझे स्मरण कर आणि निष्काम भावनेने युद्ध कर, तु ही शेवटी मलाच येउन मिळशील" यानंतर भगवान दिवस-रात्र, शुक्ल्-क्रुष्ण पक्ष, दक्षिणायन - उत्तरायण यांच अवलोकन करतात. अखेरीस पापपुण्ययुक्त असलेली ही मर्त्य स्रुष्टी आपल्या साधनेने ओलांडून अक्षरब्रह्म पदाला पोहोचण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला करतात.

जे लोक कुठली इच्छा मनात धरून पुण्यकर्म करतात, ते पुण्यकर्माचे फळ संपून गेल्यावर पुन्हा जुने भोग भोगतात, या उलट जे सतत माझे ध्यान करतात, ध्यान करणे जर शक्य नसेल तर फळ, फूल, पान वाहून माझी पूजा अनन्यभावनेने करतात, ते लोक मलाच येवून मिळतात. तेव्हा अर्जुना तु तुझे मन माझ्या ठायी ठेव म्हणजे तू ही मलाच येवून मिळशील असा हा राजविद्या योग आहे.

Thursday, January 20, 2011

श्रीमद् भगवद्गीता ७

संपूर्णाचे ज्ञान


विश्वाची उत्पत्ती, रहस्य यांचा उलगडा करण्याची इच्छा बाळगणारे शास्त्र म्हणजे सांख्यशास्त्र. याच्या मुळाशी म्हणजे सांख्यापर्यंत  जाण्याचा मार्ग म्हणजे योग. या योगाचा उपदेश भगवंतानी अर्जुनाला केल्यावर ते पुढे अर्जुनाला सृष्टीचे विज्ञान तसेच परब्रह्माच्या ज्ञानाबद्दल सांगतात.

ते म्हणतात -  "परब्रह्माचे रहस्य जाणून घेण्याकरता - म्हणजेच मला समजण्याकरीता तुला तुझं मन माझ्याकडे एकवटले पाहिजे. आता तुला देत असलेलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूपच कमी लोक प्रयत्न करतात - आणि त्यातूनही एखादाच या ज्ञानापर्यंत पोहोचतो. तुला सांगत असलेले हे ज्ञान प्राप्त केल्यावर तुला अजून प्राप्त करण्यासारखे काहीच उरणार नाही."

भगवान पुढे म्हणतात, "पृथ्वी, अप, तेजो, वायू आणि आकाश हि पाच महाभुतं आहेत. मन, बुद्धी आणि अहंकार ही तीन तत्व अशी माझी जडप्रवृत्ती  आहे,  या सर्व विश्वामध्ये मी आहे - म्हणजेच हे विश्व मी धारण करणे अशी माझी चेतन प्रवृती आहे.  या जगात, जे काही मंगल, पवित्र असं आहे हे माझेच गुण आहेत. भूत, वर्तमान, भविष्य यांचा स्वामी मीच आहे. सत्व, रज, तम हे माझेच गुण आहेत. तुला हे सर्व समजावून घेण्यासाठी मलाच शरण जावे लागेल."


भक्तांचे प्रकार समजावून सांगताना भगवंत म्हणतात, "चार प्रकारचे भक्त माझी उपासना करतात, संकटात सापडलेले ते आर्त, उपभोगाच्या सुखासाठी झटणारे अर्थार्थी, माझा स्वरूप जाणून घ्यायची इच्छा असणारे असे जिज्ञासू आणि माझ्या स्वरूपाचं ज्ञान होवूनही ज्यांचा आनंद लोप पावलेला नाही असे ते ज्ञानी भक्त. अर्थातच या चौघांपैकी ज्ञानी भक्त सर्वात श्रेष्ठ, कारण तो भक्ती साठी भक्ती करत असतो , त्याला त्यातून काहीच मिळणार नसतं. असे हे सर्व सृष्टीचे म्हणजेच परतत्वाचे ज्ञान मी तुला देतो आहे."

     

Monday, January 17, 2011

श्रीमद् भगवद्गीता ६

ध्यानयोग

कर्मयोग आणि सांख्ययोग (सविस्तर माहितीसाठी ही साखळी पहा) यांचे विवेचन केल्यानंतर  श्री भगवंतानी योगाचे विवेचन करायला सुरुवात केली.


ध्यान कसं करावे याचा उपदेश करताना ते म्हणतात, " पवित्र, स्वच्छ अश्या ठिकाणी सुखासना  मध्ये बसावे, आणि नाकाच्या शेंड्याकडे डोळे मिटून पहावे. एकाग्रता पाळून देहाने आणि मनाने ब्रह्मचर्येचे पालन करावे. या स्थिती मध्ये श्वासावर नियंत्रण असणे ही गरजेचे आहे.  भगवंत पुढे असेही म्हणतात कि, "योग्य आहार, योग्य प्रमाणात असलेली विश्रांती, आणि योग्य ती जागरूकता याच्या द्वारे हा योगमार्ग सहज साध्य होतो.  प्रतिदिनी अशी साधना करून त्यात भर घालत राहणे हेच योग मार्गाचे सार आहे."


अश्या साधनेमध्ये रममाण झालेला 'योगी' एखाद्या दीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहत; प्रकाश देत राहतो. त्याला, दगड, माती, सोने चांदी सगळे सारखेच दिसू लागते - सगळे जगच त्याला समान भासू लागते.  त्याला सगळीकडे माझेच रूप दिसते, खरतर ते त्याचे स्वत:चेच रूप असते कारण तो आणि मी वेगळा उरतच नाही.


हे ऐकल्यावर अर्जुनाला प्रश्न पडला कि मन शांत ठेवणे म्हणजे जणू वारा शांत ठेवणे. हे असे महा कठीण काम जमवायचे कसे? त्यावर भगवंत म्हणतात तुला सतत च्या प्रयत्नाने, अभ्यासाने, अनुभवाने आणि त्यामुळे प्राप्त झालेल्या वैराग्याने असे  सगळे करता येईल.


यावर अर्जुन भगवंताना विचारतो - "एखादे वेळेस, एखादा योग मार्गाचा वाटसरू, जेव्हा त्याचा ताबा नं राहिल्याने रस्ता हरवतो, आणि योगसिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच  मरण पावतो त्याचे काय होते? त्याला कुठे जागा मिळते? भगवंत त्यावर असे प्रतिपादन करतात की, "अश्या वेळेस अश्या योग्याला - योगाचे आचरण करण्याची संधी पुन्हा एकदा दिली जाते आणि त्यामुळे योगमार्गाची अर्धवट राहीलेली हि वाट्चाल तो पुन्हा सुरु करतो आणि शेवटी परमपदाला पोहोचतो.


अश्या रितीने कर्मवीर, ज्ञानी, तपस्वी होण्याबरोअबरच भगवंत अर्जुनाला 'योगी' होण्याची आज्ञा या ध्यानयोगामध्ये करतात.       

Wednesday, January 12, 2011

श्रीमद् भगवद्गीता ५

कर्मयोग व कर्मसंन्यास

निष्काम कर्मयोग व ज्ञानयोग यांचा उपदेश ऐकून अर्जुनाने श्रीकृष्णाला शंका विचारली की कर्म आणि ज्ञान यामधील श्रेष्ठ कोण? या दोहोंपैकी कुठला रस्ता श्रेष्ठ? कर्मयोगाचे आचरण केले असता मोक्ष प्राप्त होईल कि कर्मसंन्यासाने मोक्ष साध्य होईल?


भगवान म्हणतात की, "कर्मयोगाची आणि ज्ञानयोगाची तुलना करत असता दोन्ही आचाराने हे परस्परविरुद्ध नाहीत. पण तरीही या मधले श्रेष्ठ हे निष्काम बुद्धीने केलेले कर्म हेच होय. कर्मा पासून संन्यास घेण्यापेक्षा हे कधीही उत्तमच. पूर्णत: कर्मसन्यास घेणे  म्हणजे काहीच कर्म न करणे आणि त्या मार्गे परब्रह्म प्राप्त करणे महाकठीण आहे. पण . .

जो कोणाचा रागराग करत नाही, ज्याला कुठल्या अवाच्यासवा इच्छा धरून ठेवण्याची सवय नसते, तसेच ज्याला कुठल्याही उपभोगाच्या वासनांचा मोह होत नाही त्याला कर्मयोगी मानावा. असा कर्मवीर फार थोड्या वेळातच परमेश्वरास म्हणजे मला शोधतो. आपण जे काम करतो आहे, ती भगवंताची मर्जी आहे, आणि त्या होत असलेल्या कामाचे मिळणारे फळ आपण स्वत:चा अहंकार वगळून, त्याच ईश्वरास अर्पण करत आहोत अश्या मानसिकतेमध्ये केलेले कर्म कायम पुण्यच प्राप्त करून देते. चिखलात राहूनही चिखलाशी अलिप्तपणे राहणाऱ्या कमळासारखा तो मनुष्य पापमुक्त होतो."
थोडक्यात सांगायचे तर 'रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा' हा गीतेतील कर्मयोगाचा मनोभाव आहे.

तात्पर्य असे की दु:ख, सुख किंवा इतर सगळ्या भावना या प्रत्येक कर्माच्या वाट्यात असतातच. पण मिळालेल्या आनंदाचा, दु:खाचा तसेच इतर सगळ्या भावनांचा जो अतिरेक करत नाही आणि भगवंतावर श्रद्धा ठेवून आपलं काम करत असतो तोच मनुष्य या मुक्ततेचा अनुभव घेत असतो.  म्हणजेच सुखाचा बोलबाला न करता आणि शोकाचा कडेलोट न करता भावनांना विवश करून  त्याच्या अज्ञानाचा नाश हळू हळू होत जाते आणि त्याचे अंत:करण सूर्यासारखे तेजस्वी होत जाते.

(क्रमश:)